रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात होम-हवन, पूजा आयोजित करण्यात येत आहेत. अयोध्येमध्ये सर्व रामभक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. तर खाजगी कार्यालये मात्र सुरु राहणार आहेत. या दिवशी दारुची दुकानेही बंद राहतील.
महाराष्ट्र सरकारनेही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून 22 जानेवारीला शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालये तसेच निम-शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
22 जानेवारी रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आणि आनंद देशभर पाहायला मिळणार आहे. 22 जानेवारीला देशात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
0 Comments