अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. त्यामुळे अमरावतीतील हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान, येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज झाले होते. त्याच प्रकरणातून काल महानगर पालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, शाईफेक घटनेंच मी समर्थन करत नाही असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
अमरावती पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर आमदार रवी राणा यांच्या महिला समर्थकांनी शाईफेक केल्याने अमरावती शहरात शिवरायांच्या पुतळ्याचे राजकारण यामुळे पुन्हा एकदा तापल्याचे दिसून येत आहे. नवनिर्मित राजापेठ उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पक्षाच्या पुढाकाराने १२ जानेवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, हा पुतळा बसविण्यासाठी कुठल्याच प्रकारची परवानगी न घेण्यात आल्याने अखेर शनिवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात हा पुतळा हटविण्यात आला आहे. दरम्यान, आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
0 Comments