news-details
राजकारण

“हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग…”; नितेश राणेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हान

पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हानच दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतकी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमात हाती घेऊ. मग चपला मोजण्याचं काम त्यांनी करावं”.

“आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने विरोध करत असतील तर भाजपाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो पाहा,” असं जाहीर आव्हानही नितेश राणेंनी यावेळी दिलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments