पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. कार्यक्रमाआधीच भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. यावेळी पोलिसांना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्जदेखील केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूर्णानगर येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने उभारलेल्या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. त्याचवेळी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने उद्यानाच्या समोरच झेंडे, काळ्या भीती दाखवून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीस कार्यक्रमस्थळी आल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर गर्दीमधून फडणवीसांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली. मात्र चप्पल फेकणारी व्यक्ती कोण होती हे समोर आलं नाही. भाजपा कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.
दरम्यान कार्यक्रमस्थळी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, “स्वत: काही करायचं नाही. आपल्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौर, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करुन दाखवलं याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे. ही असुया या कार्यक्रमातून दिसते. पण मला एका गोष्टीचं अतिशय दु:ख आहे ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी ज्या अण्णाबासाहेब पाटलांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि जीव दिला त्यांच्या पुतळ्याच्या उद्धाघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम होत असेल किंवा अटलजींना विरोध होत असेल तर यांची बुद्धी तपासून पाहिली पाहिजे”.
0 Comments