news-details
व्यापार

महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२२-२३

करोनामुळे मंदावलेल्या राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात मांडली. त्यातून नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याचा संदेश महाविकास आघाडी सरकारने दिला आहे.

अर्थसंकल्पातील जमा-खर्चाचा ताळमेळ काय आहे?

राज्याचा अर्थसंकल्प ५ लाख ४८ हजार कोटी रुपयांचा असून सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात महसुली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये अपेक्षित आहे. तर महसुली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यामुळे २४ हजार ३५३ कोटी रुपयांची महसुली तूट येणार आहे. बाकीची रक्कम ही विविध अनुदाने, कर्ज आदींची आहे. अर्थसंकल्पातील योजना खर्चाची रक्कम १ लाख ५० हजार कोटी रुपये आहे. त्यात भांडवली खर्चासाठी ६७ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. तर अनुसचित जाती उपयोजनेसाठी १२ हजार २३० कोटी रुपये तर आदिवासी विकास उपयोजनेत ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद आहे. सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेसाठी १३ हजार ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०२१-२२ पेक्षा ती २ हजार ३०५ कोटी रुपयांनी जास्त आहे. मागच्या वर्षी राज्यावरील कर्जाचा बोजा ५ लाख ७२ हजार कोटी रुपये होता. २०२२-२३ मध्ये ते प्रमाण ६ लाख ४९ हजार कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पातील २ लाख ३५ हजार कोटी रुपये हे वेतन, निवृत्तिवेतन, व्याजप्रदान यावर खर्च होणार असून ही रक्कम एकूण महसुली खर्चाच्या ५८.२६ टक्के आहे.

या अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा कोणत्या?

राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच क्षेत्रांवर आधारित विकासाची पंचसूत्री ही संकल्पना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली. पुढील तीन वर्षांत या विकासाच्या पंचसूत्रीवर ४ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला असून त्यापैकी १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपये हे या वर्षी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच क्षेत्रांतील विविध योजना-प्रकल्पांवर खर्च केले जाणार आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या २० लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या अनुदानासाठी १० हजार कोटी रुपये, बालसंगोपनासाठी प्रतिबालक अनुदान ११२५ रुपयांवरून थेट २५०० रुपये अशा तरतुदी करत समृद्धी महामार्गचा विस्तार गोंदिया व गडचिरोलीपर्यंत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रथम दर्जाचे ट्रॉमा केअर युनिट उभारले जाणार आहेत. महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी १६ जिल्ह्यांत १०० खाटांची खास महिलांसाठी रूग्णालये उभारली जाणार आहेत. दोन वर्षात १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन, विकास सोसायट्यांच्या संगणकीकरण, वर्षभरात ६० हजार कृषीपंपांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील कौडगाव, शिंदाळा, धुळे जिल्ह्यातील साक्री, चंद्रपूर जिल्ह्यातील वाशिम आणि यवतमाळ येथे एकूण ५७७ मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यात २५०० मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोयना, जायकवाडी, गोसीखुर्द धरणांच्या जलाशयात जलपर्यटन, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आफ्रिकन प्राण्यांची सफारी तर पुणे वन विभागात बिबट्या सफारी प्रस्तावित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी २५० कोटींचा निधी जाहीर करत शौर्य दाखवणाऱ्या लोकांसाठी छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments