news-details
राजकारण

“काही वेळा पंतप्रधान मोदी भाषणांदरम्यान वाजपेयींसारखे वाटतात पण…”; शशी थरुर यांचा टोला

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मंगळवारी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली. मात्र यावेळी त्यांनी तुलना करताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. मोदींच्या वक्तव्यांमध्ये वाजपेयी यांच्या काही छटा दिसून येतात. मात्र या व्यतिरिक्त मोदींचं बोलणं आणि कृतीचा मेळ जुळत नाही, असा टोला थरुर यांनी लगावला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदींनी दिलेली आश्वासने पाळली तरी ते देशाची चांगली सेवा करु शकतात असंही थरुर यांनी म्हटलं आहे.

“काही वेळा त्यांच्या भाषणांमध्ये ते वाजयेपी यांच्यासारखे वाटतात. ते सर्वकाही बरोबर बोलतात. मात्र ते बोलेल्या गोष्टी अंमलात आणत नाहीत. हा या दोघांमधील मोठा फरक आहे,” असं थरुर यांनी म्हटलं आहे. पत्रकार सागरिका घोष यांनी वाजयपेयी यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहिलं आहे. नवी दिल्लीमध्ये याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात थरुर बोलत होते.

थरुर यांनी यावेळी पंतप्रधान मोदींच्या काश्मीर दौऱ्याचा संदर्भ दिला. या दौऱ्यामध्ये स्थानिक तरुणांना दहशतवादाच्या मार्गावरुन परावृत्त करण्यासाठी पर्यटन वाढवण्यासंदर्भातील सुविधा निर्माण करण्याबद्दल भाष्य केलेलं. “सार्वजनिक भाषणांदरम्यान केलेल्या वक्तव्यांना कृतीची जोड दिली तर मोदी देशाची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करु शकतात,” असं थरुर म्हणाले.

यावेळेस थरुर यांनी संसदेमध्ये एखाद्या पक्षाकडे बहुमत असल्यावर कशाप्रकारे ते कायदे संमत करुन घेतात हे सांगितलं. त्याचप्रमाणे बहुमत असल्याने अनेकदा त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना विरोध करणाऱ्या सदस्यावर निलंबनाची कारवाईही केली जाते. ही संसदीय बहुमताची नकारात्मक बाजू आहे, असं मत थरुर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments