करोनानं चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही भागात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. तसेच काही रुग्ण वाढल्याने कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. चीनमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 चा फैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला व्हेरियंट आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्ये पसरत आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा करोनाची लाट येणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा असा दावा आहे की, BA.2 चा प्रसार वेगाने होत आहे पण तो घातक नाही.
कोविड टास्क फोर्सचे प्रमुख नरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, भारतात BA.2 व्हेरियंट करोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता कमी आहे. करोनाच्या तिसर्या लाटेत भारतातील ७५ टक्के प्रकरणं BA.2 सब व्हेरियंटची होती. त्यामुळे जूनमध्ये नव्या लाटेचा अंदाज वर्तवणाऱ्या आयआयटी कानपूरमध्ये फारसं तथ्य दिसत नाही. तर डॉक्टर राजीव यांनी आज तकशी बोलताना सांगितलं की, भारत आणि चीनच्या परिस्थितीत खूप फरक आहे. भारताने संसर्ग, रीइन्फेक्शन आणि ब्रेकथ्रू संसर्ग पाहिला आहे, ज्यामुळे येथील लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. तिसर्या लाटेत जितक्या वेगाने रुग्ण वाढले, तितक्या वेगाने कमी झाले.
गेल्या २४ तासात भारतात २,८७६ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३,८८४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर ९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट हा ०.३८ टक्के इतका आहे. सध्या देशात ३२,८११ करोना रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ५० हजार ५५ जणांनी करोनावर मात केली आहे. तर करोनामुळे ५ लाख १६ हजार ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १,८०,६०,९३,१०७ जणांनी करोनाची लस घेतली आहे.
0 Comments