news-details
राजकारण

नारायण राणे- नितेश राणे यांना दिलासा, दिशा सालियन बदनामी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

अभिनेता शुशांसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचे नितेश राणे यांनी स्वागत केले असून यापुढेही जिथे अन्याय होईल तेथे आम्ही आवाज उठवणार असं राणे यांनी म्हटलंय.

“नारायण राणे आणि मला दिशा सालीयन या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे. काही अटीशर्तींवर आम्हाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मी माननीय न्यायालयाचे आभार मानतो. लोकशाहीमध्ये लोकप्रतीनीधींना जो अधिकार दिला आहे, त्या अधिकाऱाला अबाधित ठेवण्याचे काम न्यायालयाने केले आहे. महाविकास आघाडी सरकारने षडयंत्र रचले, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला,” असे म्हणत नितेश राणे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “दिशा सालियन यांच्या आई-वडिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असं आम्ही ऐकतोय. त्या दिवशी महापौर दिशा सालियन यांच्या घरी गेल्या. त्यानंतर ज्या हालचाली झाल्या; त्याच्यानंतर आज न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. यापुढेही ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तिथे अन्यायाविरोधात आवाज उचलण्याचे काम नारायण राणे तसेच मी करणार आहोत. पांडेजी आता आलेले सीपी आहेत. त्यांना एक यादी दिलेली आहे. त्या यादीवर त्यांना टीकमार्क करायचे आहे. त्यानुसार आता प्रत्येकावर एफआरआय दाखल केला जातोय,” असे नितेश राणे म्हणाले.

नेमके प्रकरण काय आहे ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या वेळी नितेश राणेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत दोघांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले होते. त्यानंतर दिशाची आई वासंती यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीच्या त्याआधारे मालवणी पोलिसांनी दिशाच्या पश्चात तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये करून तिची बदनामी केल्याप्रकरणी राणे पितापुत्रावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अटकेच्या भीतीने राणे पितापुत्रांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यांनी दाखल गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला होता. यााबबत कोर्टाने राणे पिता-पुत्रांचा अर्ज मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच दोघांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गुन्हा रद्द करण्यासाठीही याचिका केली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments