राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा नेला. यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानाच्या दिशेने चपला देखील भिरकावल्या गेल्या. हा सगळा हायव्होल्टेज ड्रामा तासभर चालल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत आधी आझाद मैदान आणि शनिवारी सकाळी सीएसटीएम रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी मारलेला ठिय्या इथपर्यंत हे नाट्य येऊन पोहोचलं आहे. मात्र, शुक्रवारी नेमके हे आंदोलक अचानकपणे सिल्व्हर ओकवर पोहोचले कसे? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारामागच्या मास्टरमाईंडला शोधून काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“चिथावणीखोर भाषा कुणी वापरली? कुणी त्यांच्या भावना भडकवल्या? नको त्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घातल्या. हे लोक असा विचार करणारे नाहीत. पण कुणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. ते शोधून काढण्याचं काम पोलीस विभागाचं आहे. दिलीप वळसे पाटील यांचं म्हणणं आहे की त्यांनी देखील अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. लवकरच कुणी हे केलं याचा छडा लागेल”, असं अजित पवार म्हणाले.
0 Comments