मुंबई : भाजप – शिवसेना- राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार स्थापन करण्याचा निर्णय २०१७ मध्ये झाला होता, पण राष्ट्रवादीने शिवसेनेला विरोध केल्याने प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला नाही, या भाजप नेते आशिष शेलार यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
गेली पाच वर्षे शेलार गप्प का होते, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तर २०१७ मध्येच शिवसेनेला सत्तेबाहेर काढण्याचे भाजपचे कारस्थान होते, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
आशिष शेलार यांनी २०१७ मध्येच या विषयावर बोलायला हवे होते. पाच वर्षे ते गप्प का बसले की कोणाची वाट बघत होते, असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. २०१७ मध्ये बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची तेव्हाची आणि आताची वक्तव्ये वेगळी आहेत. आधीच्या गोष्टी काढून काय उपयोग, सध्या राज्यासमोरील प्रश्न काय आहेत, हे महत्त्वाचे, असे पवार यांनी सांगितले.
अजित पवार यांनी शेलार यांच्या गौप्यस्फोटाला उत्तर देताना दावा खोडून काढलेला नाही याकडे भाजप नेते लक्ष वेधत आहेत.
शेलार यांच्या दाव्याचे खंडन करताना राऊत म्हणाले, हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना सरकारमध्ये असतानाही भाजपला आमच्याबद्दल प्रेम नव्हते. आमचे मुद्दय़ांवर मतभेद होते. सहकारी पक्षाला अंधारात ठेवून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसशी बोलणी का केली, आमचा सरकारला पाठिंबा असताना त्याची गरजही नव्हती, हा मुद्दा राऊत यांनी मांडला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात रान उठविल्यावर २०१७ मध्ये सरकारमध्ये सामील होण्यासाठी बोलणी का केली ? शिवसेनेला सोडायचे नाही, असे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी सांगितल्याचा शेलार यांचा दावा आहे. मग ही बोलणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींना अंधारात ठेवून केली होती का? शिवसेनेला सोडायचे नव्हते, तर मग भाजप आपली मंत्रीपदे कमी करुन राष्ट्रवादी काँग्रेसला देणार होते का, असे सवाल राऊत यांनी केले.
0 Comments