चंडीगड :पतियाळामध्ये शुक्रवारी हरीश सिन्ग्ला यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (बाळ ठाकरे) या संघटनेने खलिस्तानधार्जिण्या गटांच्या विरोधात कालिमाता मंदिर परिसरात मोर्चा काढला. या संघटनेचे कार्यकर्ते आणि शीख तसेच निहंग यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. शहरातील स्थिती तणावपूर्ण असून शनिवापर्यंत संचारबंदी लागू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पतियाळा दूरक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक राकेश अगरवाल यांनी सांगितले की, सध्या येथील स्थिती नियंत्रणात आहे. मोर्चातील काही कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची अफवा पसरल्यानंतर येथे तणाव पसरला, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने मोर्चाची हाक दिल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी येथील दु:खनिवारण गुरुद्वारेत निहंग जमले होते. ते खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत कालिमाता मंदिराकडे जाऊ लागले. त्यांना पोलिसांनी रोखले. या वेळी एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी शहरात ध्वजसंचलन केले तसेच अन्य जिल्ह्यांतून पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.
0 Comments