मशिदींवरील भोंगे उतरविले नाही तर मशिदींसमोर ध्वनीक्षेपक लावून त्यावर हनुमान चालिसा वाजविण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे आठ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मशिदींवरील भोगे उतरविले नाहीतर, मशिदींसमोर ध्वनीक्षेपक लावून त्यावर हनुमान चालिसा वाजविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी आणि मुंब्रा शहरात मोठ्याप्रमाणात मुस्लीम बांधव वास्तव्य करतात. या भागात सुमारे ३०० मशिदी आहेत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १ हजार ४०० हून अधिक जणांविरोधात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीसा बजावल्या आहेत.
तसेच बुधवारी सुमारे आठ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये ३५० अधिकारी आणि ७५०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, ३०० गृहरक्षकांचा सामावेश आहे. तसेच आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखावी तसेच जातीय सलोखा आबाधित ठेवावा असे आवाहन सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.
0 Comments