विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार आहे. राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार आहे. राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात शेड्युल 10 चा सेक्शन 2 (A) अंतर्गत राष्ट्रवादीची सुनावणी घेण्यात येणार आहे. 2 A अंतर्गत अजित पवार गटावर स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावं अशी शरद पवार गटाची मागणी आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
0 Comments