मी लवकर आल्यानं काहींची अडचण झाली. सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरं पडतं. पण त्यामुळं काहींची अडचण झाल्याचं दिसतंय,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. तसंच एक किंवा दोन आपत्यावर थांबा. खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आला तरी घरं बांधून देऊ शकणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल. मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नका. तर ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, म्हणून अगदीच भारावून जाऊ नका. पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेंभुर्णीला जाऊन तिथं उधळपट्टी करू नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही पारदर्शक आहे. तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले दादा माझी चिठ्ठी काढा तर ते मला ही जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात,जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमलेले नसतात. अगदी कोणाचे पीए असतील त्यांच्यावर ही विश्वास ठेवू नका. नाहीतर दस का बीसचे प्रकार घडतात. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झाल, असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करतात. अशा शहाण्यांना मी सरळ करणार आहे.
0 Comments