अनेक वर्षांच्या प्रतिक्षानंतर आज आपले राम आले आहेत. बलिदान त्यागामुळे प्रभू श्रीराम अवतरले आहेत. रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत. आता ते दिव्य मंदिरात राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापनानंतर बोलत होते. प्रभू श्रीरामाचा आपल्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे. 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम आहे. आजची वेळ सामान्य नाही. हजारो वर्षानंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार आहे, असे मोदी म्हणाले.
अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण अखेर आज आला. अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते विधीवत पार पडली. अवघ्या 84 सेकंदाच्या मुहूर्तावर रामाच्या लोभस बालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. सध्या अयोध्येसह देशभरात एक अनोखा उत्साह आहे. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले. सगळी अयोध्यानगरी राममय झाली. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवनिर्मित राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान प्रभू श्रीरामाला ‘दंडवत प्रणाम’ केला.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आजच्या आनंदाचे शब्दात वर्णन होऊ शकत नाही. राममंदिर निर्मितीमुळे सर्वांमध्ये उत्साह आहे. नरेंद्र मोदी कठोर तपस्वी आहेत. सत्य, करुणा, सेवा परोपकाराने रामराज्य होते.आजचा कार्यक्रम नवीन भारताचे प्रतिनिधित्व आहे. राममंदिर तयार झालेय, आता रामराज्य निर्मिती करावी. रामराज्य आणणं नागरिकांचेही कर्तव्य आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपवास सोडला. त्यांनी 11 दिवस अन्यत्याग केला होता. गोविंददेव गिरी महाराज यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजर्षी उपाधी दिली.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मंदिरात फक्त एका मूर्तीची प्रतिष्ठा झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होऊ शकली. पंतप्रधानांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी सर्व नियमांचं पालन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तपश्चर्या आणि अनुष्ठान बघता ह्या परंपरेला साजेल असा एकच राजा होता तो म्हणजे राजा शिवछत्रपती.
0 Comments