शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच एसीबीने राजन साळवी यांच्या निवासस्थानी छापा मारला होता. त्यानंतर आज आमदार साळवी आणि त्यांच्या मोठ्या बंधूंची एसीबीने दोन तास चौकशी केली.
आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, लाचलूचपत विभागाने माझ्या बंधूशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली आहे. ती त्यांना आम्ही आठवडाभरात देणार आहोत असे साळवी यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर एसीबीने झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांची काही तास चौकशीही करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या बँक खात्याचीही तपासणी करण्यात आली. या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे असं सांगत आपल्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप आमदार साळवी यांनी केला.
ज्या दिवशी एकनाथ शिंदे 40 आमदारांना फोडून गेले, तेव्हापासून मी शिंदे गटात जाणार अशी अफवा उठवली जात आहे, पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे. राजन साळवी शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही म्हणून सरकारचे हे कृत्य आहे असा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी राजन साळवी यांनी सहा वेळा एसीबी चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयामध्ये हजर लावली होती. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीने राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments