आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु होती. पण त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. तसेच मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. मात्र या वेळी आलेल्या नोटीसीनंतर रोहित पवारांनी चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे रोहित पवारांच्या मागे ठामपणे उभे आहेत.
रोहित पवार हे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांचे पुतणे आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ऑगस्ट 2019 च्या एफआयआरमधून समोर आलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर रोहित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यात त्यांनी संघर्ष यात्रा सुद्धा काढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना ईडीची नोटीस येऊन धडकली आहे.
0 Comments