आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवार यांच्या समर्थनात पक्ष शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार आहेत. दरम्यान, चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. त्याशिवाय कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी कोली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. आता ईडीनं पुन्हा आपला मोर्चा रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोकडे वळवला आहे.
सध्याचा आठवडा चौकशांचा आठवडा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सोमवारपासून सुरु झालेल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी बोलावलेलं. कथित बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली आहे. त्यानंतर मंगळवारी ठाकरे गटाचे आमदार रवींग्र वायकर यांनाही 11 वाजता ईडीनं चौकशीसाठी समन्स धाडलं आहे. जोगेश्वरीतील भूखंडप्रकरणी वायकरांची चौकशी सुरू आहे. तर आज म्हणजेच, बुधवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. बारामती अॅग्रोप्रकरणी ही चौकशी होणार आहे. तर, गुरुवारी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनाही ईडीनं चौकशीसाठी पाचारण केलं आहे. कोरोना काळातील कथित बॉडीबॅग प्रकरणी ही चौकशी होणार आहे. त्यामुळे या आठवड्याच्या चार दिवसांत विरोधकांच्या चार नेत्यांच्या होणाऱ्या चौकशांची राज्याच्या राजकीय तसंच सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.
0 Comments