पुणे : मुलीशी असलेले मैत्रीसंबंध तोडून न टाकल्याने एका युवकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना वारजे पोलिसांनी अटक केली.
प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय २२, रा. रामोशीवाडी, सेनापती बापट रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अजय विजय पायगुडे (वय १९), विजय किसन पायगुडे (वय ५०), वंदना विजय पायगुडे (सर्व रा. साईश्रद्धा रेसीडन्सी, दांगट पाटीलनगर, शिवणे), सागर गोिवद राठोड (वय २१, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलाचा आतेभाऊ कांबळे याचे पायगुडे यांच्या नात्यातील एका मुलीशी मैत्रीसंबंध होते. मैत्रीसंबंध तोडून टाकण्यासाठी पायगुडे कांबळेवर दबाब टाकत होते. आरोपींनी त्याला धमकावलेही होते. दोन दिवसांपूर्वी रात्री कांबळे शिवणे परिसरात गेला होता. त्या वेळी आरोपींनी त्याच्यावर शस्त्राने वार केले. सिमेंटचा गट्टू तसेच गजाने बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पार्वे आणि तपास पथकाने चौघांना अटक केली. या प्रकरणात खून तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून साहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
0 Comments