शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि भाजपा असा थेट संघर्ष विधानसभेमध्ये पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “हा दाऊद आहे कुठे? निवडणुकीसाठी हा विषय किती काळ वापरणार? तुम्ही आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार का?, विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ईडी’ आहे की तुमचा घरगडी?” अशी टीका करत भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी थेट युक्रेन युद्धाचा संदर्भ दिला.
मुख्यमंत्र्याचे टोमणे आणि टोले…
विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजप नेत्यांचे आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर देणारे भाषण केले. गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफटत आणण्याची घोषणा केली होती. पण आता दाऊदच्या मागे आपण फरफटत चाललो आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ओसामा बिन लादेनच्या नावाने मते मागितली नाहीत, तर त्यांनी घरात घुसून लादेनला ठार केले, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला. अशाप्रकारचे अनेक टोमणे आणि टोले उद्धव यांच्या भाषणामध्ये होते.
0 Comments