news-details
शिक्षण

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला!

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २० जुलैला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ३० एप्रिलपर्यंत अर्ज भरता येईल, तर २ मेपर्यंत शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. मात्र करोना प्रादुर्भावामुळे विलंबाने सुरू झालेल्या शाळा, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेला पोलिस तपास, परीक्षेचे कामकाज देण्यात आलेल्या खासगी कंपनीने न्यायालयात दाखल केलेली याचिका अशा कारणांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियोजनावर परिणाम झाला. शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली नसल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तसेच या परीक्षेच्या तारखेकडे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदा २० जुलैला राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी पाचवी आणि आठवीची परीक्षा घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ३० एप्रिल आणि शुल्क भरण्यासाठी २ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
गेल्यावर्षीही करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिष्यवृत्ती परीक्षा लांबली होती. आता सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा लांबल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments