इराणनं पाकिस्तानवर (Pakistan) क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवत दहशतवादी तळं उध्वस्थ केली होती. इराणच्या हल्ल्यानंतर अस्वस्थ झालेल्या पाकिस्ताननं आता इराणवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला. इराणच्या हल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्ताननं इराणच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला चढवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानच्या मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या हल्ल्याबाबत इराण किंवा पाकिस्तानकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.
पाकिस्तानी माध्यमांमार्फत समोर आलेल्या माहितीनुसार, इराणमधील बीएलए दहशतवादी तळांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), बलुचिस्तान लिबरेशन फोर्स (BLF) यासारखे बलूच फुटीरतावादी दहशतवादी गट इराणमध्ये सक्रिय आहेत, जे पाकिस्तानविरोधी कारवाया करतात.
पाकिस्तानी हल्ल्यापूर्वी इराणचे परराष्ट्र मंत्री आमिर अब्दुल्लाहियान म्हणाले होते की, दोन्ही देशांमध्ये बंधुत्वाचे संबंध आहेत. इराणनं पाकिस्तानच्या हद्दीत हल्ला केला असला तरी हा हल्ला पाकिस्तानवर नसून पाकिस्तानात लपलेल्या इराणी दहशतवाद्यांवर आहे, असं परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं होतं. ते म्हणाले, "जैश उल-अदल ही इराणी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी पाकिस्तानच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील काही भागांत आश्रय घेतला आहे."
0 Comments