आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४९ व्या लढतीत बंगळुरुने चेन्नईला १३ धावांनी धूळ चारली. महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जाडेजा यांच्यासारखे दिग्गज फलंदाज आपली कमाल दाखवू न शकल्यामुळे चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे बंगळुरुच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवल्यामुळे बंगळुरुचा विजय सोपा झाला. बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र वीस षटके संपेपर्यंत चेन्नई संघ फक्त १६० धावा करु शकला. या विजयासह आता बंगळुरुच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा आशा पल्लवित झाल्या आहेत. तर दुसरीकडे चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य दिले. मात्र ही धावसंख्या गाठताना चेन्नईची पूर्णपणे धांदल उडाली. डेवॉन कॉन्वे वगळता चेन्नईचा एकही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. सलामीला आलेल्या कॉन्वेने ३७ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. तर कॉन्वेसोबत आलेला ऋतुराज गाडकवाड २३ चेंडूंमध्ये २८ धावा करु शकला. दुसऱ्या विकेटसाठी आलेला रॉबिन उथप्पा अवघी एक धाव करुन झेलबाद झाल्यामुळे संघ अडचणीत आला.
0 Comments