आज रामललाची मूर्ती राम मंदिरात प्रवेश करणार आहे. आजपासून मूर्तीच्या पूजाविधीला सुरुवात होईल. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. बहुप्रतिक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिर ट्रस्टचे सदस्य आणि त्यांच्या पत्नींच्या उपस्थितीत असून वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे. अयोध्येतील नवीन मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने याची सांगता होईल. 16 जानेवारीपासून रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे.
आज प्रभू श्रीरामाचा बालस्वरुप म्हणजे रामलला राम मंदिर परिसरात प्रवेश करणार आहे. आज मूर्तीच्या विविध पूजा विधींना सुरुवात होणार आहे. यानंतर उद्या रामललाच्या मूर्तीचा गर्भगृहात प्रवेश होईल आणि त्यानंतर पुढील विधी होतील. देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येमध्ये दाखल होत आहेत. यासोबत अयोध्येमध्ये पर्यटकांचीही रेलचेल पाहायला मिळत आहे.
आज बुधवार, 17 जानेवारीला दुपारी 1:20 नंतर जलयात्रा, तीर्थ पूजा, ब्राह्मण-बटूक-कुमारी-सुवासिनी पूजा, वर्धिनी पूजा, कलशयात्रा आणि प्रसाद आवारात भगवान श्री रामलला यांच्या मूर्तीची यात्रा काढली जाईल.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टमध्ये लिहिलं आहे की, गर्भगृह प्राण प्रतिष्ठा पूजा मंगळवारपासून सुरु झाली. 16 जानेवारीला साधू संत, विद्वानांनी तपश्चर्या केली आणि सरयू नदीत स्नान केलं. विष्णूची पूजा करून पंचगव्य आणि तूप अर्पण करून पंचगव्यप्राशन केलं. यानंतर प्रायश्चित्त म्हणून दान केलं. त्यानंतर कर्मकुटी होम करण्यात आला. या कार्यक्रम मोठ्या संपन्न झाला. हवनाच्या वेळी मंडपात वाल्मिकी रामायण आणि भुसुंदीरामायणाचे पठण करण्यात आलं.
0 Comments